नाशिक : प्रतिनिधी
शनिवारी जीएसटी विभागाच्या पुणे येथील गुप्तचर यंत्रणेने नाशिक शहरातील देवळाली परिसरात मोठी कारवाई केली होती. एका सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या घरावर छापा टाकून त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात येत होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
नाशिक शहरात जीएसटी गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत एक मोठे घबाड उघडकीस आणले आहे. सॉफ्टवेअर अभियंत्याच्या घरी करण्यात आलेल्या छापेमारीत जीएसटी गुप्तचर खात्याने कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान एका रिव्हॉल्व्हरचीही जप्ती करण्यात आली आहे.
ही धाड श्रीकांत परे नावाच्या तरुणाच्या घरी टाकण्यात आली होती. तो सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, ऑनलाईन गेमिंग ऍप तयार करून विक्री करायचा. या व्यवसायातून त्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचा संशय जीएसटी विभागाच्या अधिका-यांना होता. या संशयाच्या आधारे जीएसटीच्या गुप्तचर पथकाने छापा टाकला असता, दोन पेट्यांमध्ये भरलेली कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली आहे. या कारवाईनंतर श्रीकांत परे या संशयित तरुणाला पुण्याला नेण्यात आले असून, तिथे जीएसटी गुप्तचर विभागाच्या अधिका-यांकडून पुढील चौकशी केली जात आहे.

