नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद कायम आहे. एकिकडे रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे राहणार की नाही, यावरून तिढा कायम आहे. अशात दिल्लीतून एक महत्त्वाचा संदेश काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रिपद अन्य कोणाकडे दिले जाणार नाही, असा भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने स्पष्ट संदेश दिला आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रिपद हे भाजपकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, या नियुक्तीनंतर शिवसेना शिंदे गटाने दोन्ही नियुक्त्यांवर आक्षेप घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील उच्चपदस्थांकडे तक्रार केल्यावर २४ तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती.
त्यानुसार, १९ जानेवारीला स्थगिती देण्यात आल्यापासून महिनाभरापेक्षा जास्त काळ उलटला तरी अद्याप रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर तोडगा निघालेला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पातळीवरही सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकचे पालकमंत्रिपद मिळणार नसल्यास रायगडचे पालकमंत्रिपद कायम राहावे, अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते. नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार हे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाले. या बैठकीला मंत्र्यांपैकी फक्त गिरीश महाजन उपस्थित होते.