निलंगा : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला निलंगा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने, भाजी मार्केटसह अनेक व्यावसायिक आस्थापना दिवसभर बंद राहिल्याने शहरात बंदचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला.
बंदनंतर राष्ट्रपतींकडे पाठविण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच लोकशाहीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना संवादातून न्याय मिळाला पाहिजे, दडपशाहीतून नव्हे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला निलंग्यात विविध समविचारी पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दिला. संविधान, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणा-यांविरुद्ध कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे विलास सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब बनसोडे, सूर्यकांत कांबळे, रजनीकांत कांबळे, छावा संघटनेचे तुळशीदास साळुंके, विजयकुमार सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, अर्जुनाप्पा कटके, धनराज कांबळे, भगवान कांबळे, प्रदीप सोनकांबळे, मातंग चळवळीचे सतीश कांबळे, सिराज शेख, साहेबराव कांबळे, प्रकाश गायकवाड, बालाजी कांबळे, गजेंद्र कांबळे, सोनेराव बनसोडे, नागनाथ नरहरे, सुनील आरेराव, रावबा शिंदे, दत्ता सूर्यवंशी (माळेगावकर), संदीप बनसोडे, एजाज सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
















