गडकरींची उपस्थिती, साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
औसा : प्रतिनिधी
किल्लारी येथे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर पुन्हा सुरू होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे. या घटनेमुळे किल्लारीसह तीन तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरू होण्याची आशा शेतक-यांनी जवळजवळ सोडली होती. मात्र आमदार अभिमन्यू पवार यांनी दिलेला शब्द पाळत कारखाना पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज किल्लारी परिसर पुन्हा बहरणार आहे. पूर्वी साडेबाराशे टीसीडी क्षमतेने चालणारा हा कारखाना आता अडीच हजार टीसीडी क्षमतेने गाळपासाठी सज्ज झाला आहे. यंदा साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतक-यांना योग्य दर देण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले.
मोठ्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींवर मात करून नव्या दमाने उभा राहिलेला निळकंठेश्वर कारखाना आज शेतक-यांच्या संघर्षाचे प्रतीक ठरला आहे. अत्याधुनिक मशिनरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज हा कारखाना आता दुप्पट उत्पादन क्षमतेने कार्यरत होणार आहे. या पुनरुज्जीवनामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गळीत हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून हजारो शेतकरी, सभासद, अधिकारी व नागरिक या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

