Homeराष्ट्रीयनिवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणणार?

निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणणार?

तृणमूल कॉंग्रेसचा पुढाकार, विरोधी पक्षांकडून समर्थन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विरोधी पक्षांकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा झालेली असतानाच आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. तृणमूलच्या या निर्णयाला विरोधी पक्षांकडून समर्थन देण्यात आले आहे.

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआरमधील अनियमिततांचे कारण देत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रस्तावाची घोषणा तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केली. संविधानाच्या कलम ३२४ नुसार ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाईल, असे ते म्हणाले. आम्ही महाभियोग प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात राज्य घटनेच्या कलम ३४२ नुसार आणत आहोत. कुमार यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी असल्याचे सौगत रॉय यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये ५९ लाख मतदार ऍज्युडिकेशन यादीत म्हणजेच न्यायनिर्णय प्रक्रियेत असून ही खूप मोठी संख्या आहे. ममता बॅनर्जी जे म्हणत आहेत, ते बरोबर आहे. आम्ही येत्या काही दिवसांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणत आहोत, असे रॉय म्हणाले.

काँग्रेसचा पाठिंबा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तृणमूल काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा देऊ, असे म्हटले. महाभियोग प्रस्ताव ही स्वागतार्ह बाब आहे, आम्ही या मुद्यावर काही काळ संघर्ष केला आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस खासदार सुखदेव भगत यांनी देखील एसआयआर राबवण्याच्या प्रक्रियेवर टीका केली. काँग्रेसला पाठिंबा देणारे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी केली. समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी टीएमसीच्या प्रस्तावाचे स्वागत केले. याशिवाय त्यांनी महाभियोग प्रस्तावावेळी तृणमूल काँग्रेससोबत राहणार असल्याचे म्हटले.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR