22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रनिष्ठावंतांना डावलल्याने भाजपमध्ये राडा

निष्ठावंतांना डावलल्याने भाजपमध्ये राडा

विजय वडेट्टीवारांचा दावा; काँग्रेसमध्येही तक्रारी येत असल्याची कबुली

मुंबई : प्रतिनिधी
भाजपने निष्ठावंतांना डावलून उप-या लोकांना तिकिट दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या संयमाचा उद्रेक झाल्याची भावना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केली आहे. भाजपचे सध्याचे धोरण वापरा व फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात इच्छुक उमेदवार नाराज झाले असून भाजपमध्ये राडा तर होणारच अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला गृहकलह आता जवळपास नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयापुढे संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची गाडी रोखून धरली. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी प्रशांत भदाने नामक इच्छुक उमेदवाराने आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी सावे व कराड यांनी पोलिस संरक्षणात तेथून काढता पाय घेतला.

या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या अंतर्गत कलहावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजमध्ये राडा तर होणारच आहे. कारण, सर्वच पक्षांमध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये हे प्रमाण सर्वांत जास्त आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याची ओरड होत आहे. निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची चर्चा जोरात आहे. त्यातून हा उद्रेक झाला आहे. खरे तर भाजपचे धोरण वापरा आणि फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात जो आक्रोश दिसत आहे, तो बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे होत आहे. पूर्वी काँग्रेसची जी स्थिती होती ती स्थिती आता भाजपची झाली आहे.

ते पुढे म्हणाले, संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेनेची युती होण्याचे शेवटपर्यंत संकेत होते. पण काल त्यांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांना जागा देण्याचा स्कोप होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. सध्या जे वातावरण तयार झाले तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला त्यावर अधिक भाष्य करणे चुकीचे वाटते. पण एक गोष्ट नक्की आहे की, काँग्रेस वैचारिक दृष्टिकोनातून लढत आहे, तर भाजप हा सत्ता मिळवण्यासाठी निष्ठा बाजूला ठेवून निवडणूक लढवत आहे व त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी तिकिट वाटप केले हे स्पष्ट होते, असे वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणाले भाजपचे इच्छुक उमेदवार?
भाजपचे इच्छुक उमेदवार प्रशांत भदाने आपल्या पक्षावर संताप व्यक्त करताना म्हणाले की, मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो. रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकिट देऊन माझा घात केला. मला अंधारात ठेवले गेले. आता मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR