नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट युजी २०२६ परीक्षा रद्द करण्याच्या प्रकरणात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन ने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली. दरम्यान नीटची परिक्षा येत्या जुलैच्या दुस-या आठवडयात होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
एफएआयएमएने म्हटले आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या कार्यप्रणालीवरील विश्वास आता उडाला आहे. त्यामुळे सध्याच्या गव्हर्निंग बॉडीची पुनर्रचना केली पाहिजे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय महाराष्ट्रातील नाशिकला पोहोचली. आरोपी शुभम खैरनारला ताब्यात घेतले. तसेच, हरियाणाच्या गुरुग्राममधून बीएएमसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खरे तर, एनटीए ने १२ मे रोजी पेपरफुटीनंतर एनईईटी परीक्षा रद्द केली. एनटीएने कबूल केले की गडबड झाली आहे. ही परीक्षा ३ मे रोजी झाली होती, ज्यात २२.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.
गडबड केली मान्य
एनटीए डीजी अभिषेक सिंह म्हणाले की, या गडबडीसाठी आम्ही जबाबदार आहोत. परीक्षा पुन्हा घेतली जाईल. ६ ते ८ दिवसांत नवीन तारखेची घोषणा होईल. दुसरीकडे, केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली. एजन्सीने या प्रकरणात एफआयआर दाखल केला. एनटीएने सांगितले की, भारत सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केरळमधून सीकरला पोहोचला
एनईईटीचा पेपर ‘प्रश्न बँक’द्वारे लीक करण्यात आला. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे ३०० हून अधिक प्रश्न होते. हे सर्व हाताने लिहिलेले होते आणि त्यांची हस्ताक्षरेही एकच होती. तपास यंत्रणा शोध घेत आहेत की हा पेपर नेमका कुठून लीक झाला. तथापि, याचा खुलासा राजस्थानमधील सीकर येथून झाला.
















