नवी दिल्ली : ‘नीट २०२६’ च्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा शुल्क परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार आता अधिकृत रजिस्ट्रेशन पोर्टलवर लॉगिन करून आपल्या बँक खात्याची माहिती भरू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिफंडची रक्कम थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा होईल. बँक डिटेल्स भरण्याची शेवटची तारीख २७ मे २०२६ रात्री ११: ५० पर्यंत आहे.
३ मे २०२६ रोजी झालेली ‘नीट २०२६’ परीक्षा अनियमिततांच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. एनटीएने स्पष्ट केले आहे की, पुन्हा परीक्षा देणा-या सर्व उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
एनटीए या सार्वजनिक नोटिशीनुसार, उमेदवाराने आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डने अधिकृत पोर्टलवर लॉगिन करावे. तिथे Refund Link उपलब्ध आहे. या लिंकद्वारे बँक खात्याची संपूर्ण माहिती भरावी लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रिफंड प्रक्रिया राबवली जाईल. यामध्ये खातेधारकाचे पूर्ण नाव, ‘आयएफसी’ कोड, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, रद्द केलेल्या चेकची स्कॅन कॉपी (पर्यायी).
एनटीएने स्पष्ट केले की, रद्द चेक अपलोड करणे अनिवार्य नाही, परंतु त्यामुळे खात्याची पडताळणी सोपी होते आणि रिफंड प्रक्रिया वेगवान होते.
एकदा माहिती भरली की बदलता येणार नाही
उमेदवारांना विशेष सूचना दिली आहे की, एकदा बँक डिटेल्स जमा केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. म्हणून उमेदवारांनी अकाऊंट नंबर, आयएफसी कोड, नाव इत्यादी माहिती अत्यंत काळजीपूर्वक आणि दोनदा तपासून भरावी. चुकीची माहिती दिल्यास रिफंड प्रक्रिया विलंबित किंवा अडचणीत येऊ शकते.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
एनटीएच्या निर्णयामुळे लाखो नीट २०२६ उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ऑनलाईन बँक डिटेल्स भरल्याने रक्कम थेट खात्यात मिळणे सोयीचे झाले आहे. नीट २०२६च्या पुनर्परीक्षेसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांना आता आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण राहणार नाही.
















