मंत्री विखे पाटील यांची पुतणी
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली. नीला विखे पाटील या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक जिंकली. त्यांचे कुटुंब महाराष्ट्रातील विखे पाटील फाउंडेशनशी जोडलेले आहे.
संसदेत निवड झाल्यानंतर नीला यांनी सांगितले की, स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. शहर आणि देशासाठी योगदान देण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले. बालकल्याण आणि पर्यावरण हे नीला यांच्या कामातील महत्त्वाचे विषय असणार आहेत. तसेच जे लोक मतदान करू शकत नाहीत, त्यांचाही आवाज संसदेत मांडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नीला यांचे महाराष्ट्राशी असलेले नातेही कायम आहे. मला भारतावर खूप प्रेम आहे आणि भारताशी माझे घट्ट नाते आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. नीला विखे पाटील या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती आहेत.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात आहेत. नीला विखे पाटील यांनी आपल्या कुटुंबाचा सहकार आणि राजकीय वारसा पुढे नेत स्वीडनच्या संसदेत खासदार झाल्या आहेत. नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. त्यांचे सुरुवातीचे बालपण मात्र अहमदनगरमध्ये घालवले. त्यांनतर गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र व कायद्यासह पदवी आणि एमबीए पूर्ण केले. तसेच मादीद्र येथील युनिव्हर्सिटी डी कॉम्प्ल्युटेन्स येथूनही एमबीए पदवी संपादन केली. त्यांनतर त्यांनी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात वित्त, कर आणि गृहनिर्माण क्षेत्रांसाठी सल्लागार म्हणून काम केले.
















