20.5 C
Latur
Sunday, January 25, 2026
Homeअंतरराष्ट्रीयनेस्लेच्या बेबी मिल्क पावडरमध्ये विषारी घटक?

नेस्लेच्या बेबी मिल्क पावडरमध्ये विषारी घटक?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक अन्न आणि पोषण उद्योगाताली आघाडीची कंपनी नेस्ले सध्या मोठ्या अन्न सुरक्षा संकटाला सामोरे जात आहे. बाळाच्या दूध पावडरमध्ये विषारी घटक आढळण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने तब्बल २५ देशांतील बालक पोषण उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. या परत मागविलेल्या बॅचेस केवळ व्यावसायिक दृष्टीनेच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अन्नसुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे भारतीय पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

याबाबत खुद्द नेस्ले कंपनीने स्पष्टीकरण दिले असून, त्यांच्या एसएमए, बीईबीए आणि एनएएन या लहान बाळांसाठीच्या दूध पावडरच्या ठरावीक बॅचेसमध्ये सेर्युलाईड हा विषारी घटक मिसळलेला असण्याची शक्यता आहे. सेर्युलाईड हा बॅकिलस सेरेअस नावाच्या जीवाणूच्या काही विशिष्ट प्रकारांमुळे तयार होणारा विषारी पदार्थ आहे. विशेष म्हणजे हा विषारी घटक उकळतण्या पाण्याने, स्वयंपाक प्रक्रियेत किंवा पावडरपासून दूध तयार करताना नष्ट होत नाही, असे ब्रिटनच्या फूड स्टँडर्डस् एजन्सीने स्पष्ट केले आहे.

नेस्लेने विविध देशांतून परत मागवलेल्या बॅचेसचे प्रमाण मोठे आहे. युरोपमधील अनेक देशांसह तुर्की, अर्जेंटिना, युके, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, हॉंगकॉंग आणि न्यूझीलंडसारख्या बाजारपेठांमध्ये ही कारवाई करण्यात आली. ऑस्ट्रियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते ही नेस्लेच्या इतिहासाताली सर्वांत मोठी घटना आहे. यात १० हून अधिक कारखान्यांमध्ये तयार झालेल्या ८०० पेक्षा जास्त उत्पादनांचा समावेश आहे. मात्र, नेस्लेने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.

नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार एका प्रमुख पुरवठादाराकडून मिळालेल्या अ‍ॅरॅचिडॉनिक अ‍ॅसिड तेलामध्ये गुणवत्ता समस्या आढळली आहे. एआरए तेल हे बालक पोषण उत्पादनांमध्ये मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे मानले जाते. या घटकाचा वापर विविध उत्पादन केंद्रांमध्ये झाल्याचे तपासात समोर आले असून, नेदरलँडमधील एका कारखान्यात प्रथम धोका लक्षात आला. पुढील तपासणीत हा कच्चा माल नेदरलँडस्बाहेरील अनेक ठिकाणी वापरला गेल्याचे डच अन्नसुरक्षा प्राधिकरण एनव्हीडब्ल्यूएने सांगितले.

सेर्युलाईडमुळे बाळाला
अन्नविषबाधेचा धोका
सेर्युलाईडमुळे होणारी अन्नविषबाधा ही विशेषत: लहान बाळांसाठी धोकादायक ठरू शकते. नेस्लेच्या अधिकृत निवेदनानुसार या विषारी घटकामुळे सतत उलटी, अतिसार, पोटात मुरडा आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे साधारणपणे ३० मिनिटांपासून ६ तासांच्या आत दिसून येतात. आतापर्यंत कोणत्याही देशात अशा आजाराची प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. बालकांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने खबरदारीला प्राधान्य देण्यात आले.

खबरदारीचा उपाय म्हणून
परत मागवली उत्पादने
नेस्लेने परत मागविलेला साठा खबरदारीचा उपाय म्हणून केलेली कृती असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने संबंधित संशय असलेल्या उत्पादनांचे वितरण थांबविले असून, पर्यायी पुरवठादारांकडून एआरए तेल घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनेक कारखान्यांमध्ये उत्पादन वाढवून नियमित उत्पादने बाजारात जलद गतीने पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR