लातूर : प्रतिनिधी
न्यायदान ही केवळ एक प्रक्रिया नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. कायद्याच्या गुंतागुंतीच्या चौकटीत सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी आणि भावी न्यायाधीशांनी कायद्याचा सखोल अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायालय लातूरचे मुख्य जिल्हा न्यायाधीश संजय भारुका यांनी केले. दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेसाठी परीक्षक न्यायाधीश म्हणून निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश आर वाय. शेख, अॅड. शैलेश चपळगावकर, एमआयटी लॉ स्कूल पुणे येथील डॉ. भावना कडू यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये देशाच्या कानाकोप-यातून संघ सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांचे सादरीकरण, त्यांचे भाषेवरील प्रभुत्व, तथ्य, कायद्याची मांडणी, हजरजबाबीपणा तसेच कोर्टामधील शिस्त, युक्तिवाद, न्यायालयीन प्रश्नांना दिली जाणारी उत्तरे, मेमोरियलचे लिखाण इत्यादी गोष्टींचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना ५५ हजार रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम पारितोषिक मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे संघाला त्यांच्या अपवादात्मक वकिली कौशल्यासाठी कायदेशीर युक्तिवादाची स्पष्टता आणि न्यायालयीन शिस्तीसाठी १५००० रुपयांचे रोख बक्षीस, ट्रॉफी आणि उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दिवंगत अॅड. अजय भारतलाल बाजपेयी यांच्या स्मृति प्रित्यर्थ मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अॅड. अंजली दुबे यांच्याकडून ११००० रुपयांचे रोख पारितोषिक विजेत्या संघाला देण्यात आले. या स्पर्धेमधील उपविजेता सिम्बॉयसिस लॉ स्कूल पुणे यांना त्यांच्या प्रेरक सबमिशन आणि तथ्ये तसेच कायद्यावर मजबूत प्रभुत्व यासाठी १० हजार रुपयांचे रोख बक्षीस, ट्रॉफी आणि उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.
दुस-या क्रमांकावर दयानंद लॉ कॉलेज सोलापूर येथील संघाला प्रशंसनीय कामगिरीबद्दल ३ हजार रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच विशेष पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम वादी पुरस्कार श्रीमती कमलाबेन गंभीरचंद शहा लॉ स्कूल माटुंगा मुंबई यांना त्यांनी केलेले उत्कृष्ट मसुदा लिखाण तसेच संशोधन आणि अचूक कायदेशीर स्पष्टीकरण यासाठी ५ हजार रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्तम प्रतिवादी पुरस्कार नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज, नांदेड येथील संघाला अनुकरणीय मेमोरियल तयारीसाठी ५ हजार रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्तम युक्तिवादकर्ता पुरस्कार श्रीमती जैनब बेगम अब्दुल रहीम या विद्यार्थिनीला तिची प्रभावी न्यायालयीन उपस्थिती, सुव्यवस्थित युक्तिवाद आणि न्यायालयीन प्रश्नांना आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तरासाठी ५ हजार रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्वोत्तम युक्तिवादकर्ता श्रीमती आकांक्षा जमादार, नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे यांना त्यांच्या उत्कृष्ट मौखिक वकिली आणि अभिव्यक्तीच्या स्पष्टतेसाठी ३ हजार रुपये रोख बक्षीस, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये एम एस पी मंडळाचे श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी, श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे, श्रीमती कमलाबेन गंभीरचंद शहा लॉ स्कूल माटुंगा मुंबई या संघाला प्रत्येकी ३ हजार रूपये रोख बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व बक्षीसांचे वितरण उपस्थित न्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी अशा प्रकारच्या स्पर्धांमधून घेतलेला सहभाग विद्यार्थ्यांना त्यांची कायद्याप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करतो याची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदिती बिराजदार व प्रतीक्षा चव्हाण या विद्यार्थिनींनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. पुनम नाथांनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

