नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील कोणत्याही न्यायालयात न्यायदेवतेची मूर्ती दिसते. या न्यायदेवतेच्या हातात तराजू, तलवार आणि डोळ््यांवर पट्टी दिसते. अनेकदा हिंदी चित्रपटांत यावरून संवाददेखील ऐकायला मिळतात. भारतीय न्यायालयाने आता ब्रिटिश काळातील परंपरा मागे टाकून नवी पद्धत स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश कायद्यांत बदल करण्यात आले होते. आता न्यायदेवतेच्या डोळ््यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. सोबतच हाती तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयासमोर हा नवीन पुतळा बसविण्यात आला असून, खुद्द सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या बदलासाठी पुढाकार घेतला.
सरन्यायाधीशांच्या आदेशानुसार न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत. आधीच्या मूर्तीवर डोळ््यांवर पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू आणि दुस-या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची. आता नव्या मूर्तीच्या डोळ््यांवरील पट्टी हटवली गेली आहे. तसेच हातात तलवारीऐवजी संविधानाची प्रत देण्यात आली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मते आता आपल्याला ब्रिटिशांच्या परंपरा आणि वारशाच्या पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच अंध असू शकत नाही. तो सर्वांना समान पद्धतीने पाहतो. यामुळेच सरन्यायाधीश न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल केला जाण्याची गरज असल्याचे म्हटले.
यासोबतच देवीच्या एका हातात तलवारीऐवजी संविधान पाहिजे. त्यामुळे न्यायदेवता संविधानानुसार न्याय करते, असा संदेश जाईल, असे सरन्यायाधीश म्हणाले.
सरन्यायाधीशांच्या मते तलवार हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालयात हिंसा नाही तर संविधानाच्या कायद्यानुसार न्याय होतो. दुस-या हातात असलेला तराजू योग्य आहे, जो सर्वांना समान पद्धतीने न्याय देतो.
सर्वोच्च न्यायालयाच्या
ग्रंथालयासमोर नवी मूर्ती
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशानंतर न्यायदेवतेची नवी मूर्ती तयार करण्यात आली. अशी पहिली मूर्ती न्यायाधीशांच्या ग्रंथालयाबाहेर लावण्यात आली. ज्या मूर्तीच्या डोळ््यावर पट्टी नाही आणि हातात तलवारऐवजी संविधान आहे. मात्र असे आणखी पुतळे बसवणार की नाही, हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही.