न्यू यॉर्क : वृत्तसंस्था
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत जोहरान ममदानी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. ममदानींच्या रुपात न्यूयॉर्कला पहिला मुस्लिम महापौर मिळाला. या ऐतिहासिक विजयानंतर ममदानी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
जोहरान ममदानी हे भारतीय-युगांडाई वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचा जन्म युगांडाच्या कंपाला येथे झाला. त्यांची आई मीरा नायर या प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका आहेत (ज्यांनी सलाम बॉम्बे आणि मॉन्सून वेडिंग सारखे चित्रपट दिग्दर्शित केले), तर वडील प्रोफेसर महमूद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ममदानी म्हणाले, आज मला पंडित नेहरुंचे ते शब्द आठवतात, जे त्यांनी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्गारले होते. इतिहासात असे क्षण विरळाच येतात, जेव्हा आपण जुन्या युगातून नव्या दिशेने वाटचाल करतो. जेव्हा एका युगाचा अंत होतो, तेव्हा दीर्घकाळ दडपलेल्या राष्ट्राचा आत्मा मुक्तपणे व्यक्त होतो. आज न्यूयॉर्कने हेच केले आहे. जुन्याला निरोप देत नव्या, धाडसी, दूरदर्शी युगाचा आरंभ केला आहे,’’ अशी प्रतिक्रिया ममदांनी यांनी व्यक्त केली.
या निवडणुकीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे, ममदानींनी केवळ आपल्या प्रतिस्पर्ध्यांनाच पराभूत केले असे नाही, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी मतदानाच्या एक दिवस आधी ममदानींचा विरोध करत त्यांच्या प्रतिस्पर्धी अँड्र्यू कुओमो यांना पाठिंबा दिला होता. चक्क देशाचा प्रमुख विरोध करत असतानाही, ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
















