नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांदा पिकावर औषध फवारणी करताना एक हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून २७ वर्षीय माधुरी सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे दोन चिमुकल्या मुलींनी आई गमावली.
नाशिक जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येवला तालुक्यातील कातरणीजवळ रविवारी दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. कांदा पिकावर औषध फवारणी करत असताना ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून एका विवाहितेचा मृत्यू झाला. माधुरी दीपक सोनवणे (२७) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. त्यांच्या निधनाने दोन चिमुकल्या मुलींनी आईचे छत्र गमावले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माधुरी आणि दीपक सोनवणे हे अल्पभूधारक शेतकरी असून ते फक्त एक एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या पिकावर रोगराईचा धोका वाढल्याने ते दोघेही पिकाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र शेतात काम करत होते. रविवारी दुपारच्या वेळेत, ट्रॅक्टरला जोडलेल्या शक्तिशाली ब्लोअर मशिनद्वारे कांदा पिकावर औषध फवारणी सुरू होती. ब्लोअर मशिन चालवण्यासाठी ट्रॅक्टरचा वेग वापरला जात असल्याने, ते यंत्र अत्यंत वेगाने फिरत होते. ही फवारणी सुरू असताना मशिनच्या टाकीतील औषध मिश्रण किंवा पाणी संपले. हे मिश्रण पुन्हा भरण्यासाठी माधुरी सोनवणे या चालणा-या मशिनच्या अत्यंत जवळ गेल्या.

