गुवाहाटी : वृत्तसंस्था
पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने कर्णधाराला साजेशी खेळी साकारत पंजाबच्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. सॅमने दोन विकेट्स मिळवल्या आणि त्यानंतर अर्धशतकी खेळी साकारत राजस्थानच्या संघाला पराभवाचा धक्का दिला.
पंजाबने भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला १४४ धावांत रोखले होते. पण राजस्थानच्या १४५ धावांचा पाठलाग करताना पंजाबला सुरुवातीलाच चार धक्के बसले. पण यामधून कर्णधार सॅम करनने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. करनच्या या खेळीमुळे पंजाबला राजस्थानवर पाच विकेट्स राखून विजय मिळवता आला. सॅमने यावेळी ४१ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावा केल्या. तत्पूर्वी राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पंजाबला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्यानंतर अवेश खानने रिली रोसू आणि शशांक सिंग यांना बाद करत पंजाबला अजून दोन धक्के दिले. त्यानंतर युजवेंद्र चहलने जॉनी बेअरस्टोला बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला. त्यामुळे पंजाबची ४ बाद ४८ अशी होती. त्यानंतर सॅम करनने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आणि त्याच्यामुळे पंजाबचा विजय झाला.
















