तासगाव : प्रतिनिधी
पैसा, सत्ता येते आणि जाते, पण टिकतात फक्त नाती. पण काहींना नाती कळली नाहीत. बहिणी लोकसभा निकालानंतर लाडक्या झाल्या. पंधराशे रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत. पण या नात्यावरूनदेखील महायुतीत श्रेयवाद होतोय, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची सत्ताधा-यांवर टीका केली.
सावळज (ता. तासगाव) येथे दिवंगत चंद्रकांत पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, महाकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे आदींची उपस्थिती होती.
सुळे म्हणाल्या, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आर. आर. पाटील यांच्यासारख्या नेत्यांचे हात बळकट झाले. राज्यात नवीन चेहरा म्हणून रोहितकडे आपण पाहतोय. राज्यातील सर्वांत मोठी पोलिस भरती आर. आर. पाटील यांच्या काळात झाली. नेतृत्व हे संघर्षातूनच निर्माण होते. एक वर्षापूर्वी पक्ष नेला आणि चिन्हही नेले. पण पांडुरंगाने तुतारी चिन्ह आम्हाला दिले. तुतारी आज वाडी-वस्तीवर पोहोचली आहे.
पैसे, सत्ता येते जाते, पण टिकतात फक्त नाती. पण काहींना नाती कळली नाहीत. अशी टीका करून सुळे यांनी बहिणी लोकसभा निकालानंतर लाडक्या झाल्या. पैशाने नाती निर्माण होत नाहीत. पण या नात्यावरून देखील महायुतीत श्रेयवाद होतोय. आपले सरकार नक्की येणार, असा आशावादही यावेळी त्यांनी व्यक्त केला.