लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पं. मुकेश श्रीपतराव जाधव यांन ‘उस्ताद बालेखान मेमोरियल को-कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कर्नाटकातील धारवाड येथे पार पडलेल्या संगीत महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यात उस्ताद बालेखान मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
पं. जाधव हे औसा तालुक्यातील रहिवासी असून, त्यांनी तबल्याचे शिक्षण पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्याकडे तब्बल १६ वर्षे घेतले आहे. त्यांनी देशविदेशातील विविध संगीत महोत्सवांमध्ये सहभाग घेतलेला असून, स्वतंत्र तबलावादन तसेच संगत या दोन्ही क्षेत्रात त्यांचा विशेष ठसा आहे. त्यांच्या तबलावादनातील वैविध्य, संवाद साधण्याची कला आणि नादसंपन्नता यामुळे ते संगीत क्षेत्रात एक आदरणीय नाव बनले आहेत. त्यांनी आपल्या गुरूंच्या संगीत परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्यही सातत्याने केले आहे. या पुरस्कारानंतर सूरताल परिवार आणि विविध संगीतप्रेमी, गुरुबंधूंनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. अभिनंदन करणा-यांमध्ये श्रीमती सुमित्रा चिगरी, डॉ. संदीपान जगदाळे, अंगद गायकवाड, सोनू डगवाले, सौ. मीनाक्षी कोळी, प्रमोद भोयरेकर, संजय सुवर्णकार, अमर कडतने, हरीश कुलकर्णी, तेजस धुमाळ, व्यंकट काळे, परमेश्वर पाटील यांचा समावेश आहे.
















