पुणे : वृत्तसंस्था
कौटुंबिक न्यायालयाने १४ महिन्यांच्या शारीरिक विभक्ततेच्या आधारे एका जोडप्याला संमतीने घटस्फोट मंजूर केला.
मुलाच्या नावावर फ्लॅट खरेदी करण्यात यावा, जिथे तो त्याच्या आईसोबत राहू शकेल, असे निर्देशही न्यायाधीशांनी दिले आहेत. मुलगा प्रौढ होईपर्यंत वडील त्याच्या खर्चापोटी दरवर्षी १ लाख ८० हजार रुपये देतील. तसेच पत्नीला पतीच्या व्यवसायात २० टक्के भागीदारी असेल या शर्तीवर दोघे विभक्त झाले. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश किरण बने-पाटील यांनी या जोडप्याला घटस्फोट मंजूर केला.
किरण आणि शालिनी (नाव बदललेले) यांचा एप्रिल २०१९ मध्ये गुजरातमध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाचा मुलगा आहे. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. कुटुंबीयांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.
वाढत्या मतभेदांमुळे पत्नीने मे २०२३ मध्ये पतीचे घर सोडले आणि तिच्या पालकांच्या घरी रहायला गेली. अॅड. मंगेश कदम यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. १४ महिने शारीरिक जवळीक नसण्याच्या कारणावरून पतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला. नंतर पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी होकार दिला.