लातूर : प्रतिनिधी
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा व्यवसाय नसून, व्रत आहे. त्यामुळे पत्रकारांनी सत्याचा शोध घेऊन समाजाला दिशा देणे आणि लेखणीतून समाजहितासाठी आवाज बुलंद करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि निर्भिडपणे वार्तांकन करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी केले.
ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेन्डस् सर्कलच्या वतीने येथील अंबाजोगाई रोड भागातील परिवर्तन सभागृहात रविवारी पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या राज्यातील ११ पत्रकारांचा अॅड. अण्णाराव पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्यावेळी ते अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर कैलास कांबळे, ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेडस् सर्कलचे राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल, बसवंतअप्पा उबाळे, गणेश कोळी, अतुल कोनकळसे आदी उपस्थित होते.
पत्रकारितेची खरी ताकद नीतिमूल्यांत दडलेली आहे. पत्रकारितेत सत्य, नि:पक्षपातीपणा, निर्भयता आणि जनहित हे महत्त्वाचे आहे. परंतु अलिकडे राजकीय दबाव, आर्थिक हितसंबंध, जाहिरातींचा अप्रत्यक्ष प्रभाव आणि पेड न्यूजचा प्रकार अशा स्थितीत मूल्यांची कसोटी लागत आहे. याला सरकारी धोरण जबाबदार आहे. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवित असताना त्यांचेच प्रश्न मांडणारी राष्ट्रीय पातळीवर घटनात्मक संघटना नाही. त्यासाठी जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेन्डस् सर्कलने काम करावे आणि पत्रकारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी लढावे, असा मौलिक सल्ला अॅड. पाटील यांनी यावेळी दिला.
या प्रसंगी राज्यातील विविध भागांतून आलेले जितेंद्र पराडकर, विलास जोशी, प्रा. एल. डी. सरोदे, सचिन आव्हाड, राजेंद्र कांबळे, केदार पाथरकर, उमरदराज शेख (पूर्णा), शाहिदा सय्यदपाशा पटवारी-पठाण (लातूर), शेख अफसर शेख, नारायण आग्रे, तुषार वाघुळदे्रयासह सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दत्तात्रय उकिरडे, गोविंदसिंग राजपूत, उमरदराज खान, दत्तात्रय उकिरडे, अशोक पवार, निसार सय्यद, अविनाश जोशी, वसिष्ठ घोडके, फरिदा शेख, दस्तगीर शेख, सफील शेख आदींची उपस्थिती होती.

