रेणापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यासमोर शेतक-यांच्या थकित बिलाच्या मागणीसाठी संबधित शेतक-यांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. पन्नगेश्वर साखर कारखाना हा विमल अँग्रो प्रा. लि.ने विकत घेतला आहे. कारखाना कर्मचा-यांचे थकीत वेतन देण्यात यावे, तोडणी वाहतूक ठेकेदार व थकीत ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी, शेतक-यांचे शेअर्स कायम करावेत, या मागणीसाठी कर्मचारी, शेतक-यांनी अनेक वेळा जिल्हाधिकारी यांच्याकडे सदरील मागणी संदर्भात लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता परंतु त्यांच्या मागणीस यश न आल्यामुळे बुधवारी दि ६ रोजी कारखानास्थळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कारखान्याचे शेअर्स धारक शेतकरी, कर्मचारी, तोडणी वाहतुक ठेकेदार व ऊसउत्पादक शेतकरी यांचे जवळपास ४० कोटी रुपये देणे बाकी असताना विमल अँग्रोकडून कारखाना सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याच्या निषेधार्थ शुक्रवार दि.११ जुलै रोजी मनसेच्या वतीने कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, शेअर्स धारकांचा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी कारखाना प्रशासनाने चार दिवसांत निर्णय घेऊ असे सांगीतले होते. दरम्यान सन २०२१-२२ व २०२२-२३ मधील गळीत हंगामाचे शेतकरी, कर्मचा-यांचे, तोडणी वाहतूकदारांचे बिले थकविल्यामुळे साखर आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना आर आर सी जप्तीची कार्यवाही करून थकीत बिले दयावीत असा आदेश दिला होता परंतु त्यावर काहीच केले नाही ५ तारखेपर्यंत थकीत बिले द्यावीत अन्यथा ६ तारखेपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन कर्मचारी, शेतक-यांंनी दिले होते. परंतु कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी, कर्मचा-यानी कारखाना स्थळी ठिय्या आंदोलन केले आहे. या वेळी शेतकरी, कर्मचारी, ऊस उत्पादक ,तोडणी वाहतूक ठेकेदार हे उपस्थीत होते.
फोटो २०

