मुंबई : सोशल मीडियात सध्या मराठी हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे, त्याचं कारण म्हणजे परिवहन मंत्र्यांनी राज्यातील रिक्षाचालकांना मराठीत संवाद साधनं बंधकारक केलं आहे. विशेषत: मुंबईत जे परप्रांतीय रिक्षाचालक आहेत, त्यांच्यासाठी सरकारनं मराठीचे धडे द्यायलाही सुरुवात केली आहे. जिथं आपण पोटापाण्यासाठी काम करतो तिथली स्थानिक भाषा यायला हवी, तसेच मराठी अर्थात आपल्या मातृभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पण याला काही परप्रांतीयांनी विरोध दर्शवला आहे. त्यातून एकाने परत आपल्या मूळ राज्यात परत जाण्याचा निर्णय घेताना सोबत ट्रेनमधून रिक्षा घेऊन जात असतानाचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे मराठी सक्तीचा यांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियात जो व्हीडीओ व्हायरल होत आहे तो एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा व्हीडीओ आहे. प्लॅटफॉर्मवर रेल्वेगाडी थांबलेली असून या गाडीच्या लगेजच्या अर्थात पार्सलच्या डब्यात जिथून दुचाकी वाहने, तीनचाकी वाहनांची इतर राज्यांमध्ये सुरक्षितरीत्या वाहतूक केली जाते. या डब्यात एक रिक्षाचालक इतर काही लोकांच्या मदतीने आपली रिक्षा कोंबताना दिसत आहे. पण हा व्हीडीओ मराठीच्या सक्तीमुळे परत निघालेल्या रिक्षाचालकाचा आहे की नाही? याबाबत अद्याप पुष्टी होऊ शकलेली नाही. पण मराठी हॅशटॅगसह हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाला आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकावरील व्हीडीओ
हा व्हीडीओ मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकातील असून ज्या रेल्वेच्या डब्यात रिक्षा चढवली जात आहे, ती रेल्वे ०१०७४ (बनारस-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस) आहे. तर रिक्षाचा क्रमांक एमएच ०३ सीटी ५७७५. अर्थात ही रिक्षा मुंबई पूर्व (वडाळा आरटीओ) पासिंगची रिक्षा आहे. त्यामुळे रिक्षा मुंबईतून बनारस अर्थात उत्तर प्रदेशकडे जात असल्याचे या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
मराठी भाषेतच बोलण्याचे आवाहन
त्यामुळे सोशल मीडियावर ब-याच लोकांनी हा व्हीडीओ शेअर केला असून मराठी शिका नाहीतर रिक्षाचा परवाना रद्द.. या सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. तसेच या परप्रांतीय लोकांसाठी राज्य सरकारने मराठी शिकायला मोफत क्लास आणि वेळही दिला आहे. तरीपण हे लोक निघून जाऊ पण मराठी शिकणार नाही यावर अडून राहिले आहेत. पण आपण मराठी माणसं उगाचच त्यांच्या कम्फर्टसाठी त्यांच्याशी हिंदीत बोलतो. आपल्याला पण आपल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
















