नाशिक : प्रतिनिधी
नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्र शासनाच्या संस्थांवर कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप थेट संचालकांकडून झाला होता. त्यामुळे नाफेडच्या कारभाराचा फटका आता थेट शेतक-यांना बसत आहे.
नाफेड आणि एनसीसीएफ संस्थेने जुलै महिन्यात खरेदी केलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्करराव भगरे यांनी पणन मंत्र्यांना पत्र लिहिले. जुलै महिन्यातील नाफेडच्या गोदामातील सडक्या कांद्याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
आता या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश समन्वयक कुबेर जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थेने कांदा खरेदीत गैरव्यवहार केला आहे. त्याची झळ थेट महाराष्ट्रातील शेतक-यांना बसली. केंद्र शासनाच्या या संस्थांनी महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध असताना घोटाळा केला. परराज्यातील निकृष्ट आणि खराब कांद्याची खरेदी करण्यात आली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जाधव यांनी केला.
नाफेड संस्थेच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. गतवर्षी नाफेडचे अध्यक्ष आणि संचालकांनी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नाशिकच्या चार अधिका-यांना बडतर्फ करून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कांदा बाजारात विक्रीसाठी आला.
मात्र हा कांदा खरेदी करताना त्याला ‘ए ग्रेड’ असे निकष लावण्यात आले. त्यानंतर अचानक या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचे घोषित झाले. त्यात निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी झाला. त्यामुळे नाफेडच्या खरेदीबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त होत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना लाभदायी ठरण्याऐवजी नुकसानकारक काम नाफेडकडून होत असल्याची टीका होत आहे.















