गडचिरोली : बेरोजगार तरुणांच्या नोकरीच्या अपेक्षेचा गैरफायदा घेत सोशल मीडियावर बनावट भरतीची जाहिरात व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार २४ सप्टेंबर रोजी समोर आला. विशेष म्हणजे, या जाहिरातीसाठी थेट भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नाव, शासकीय चिन्ह आणि लोगोचा वापर करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या कथित जाहिरातीची जिल्हा प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या या जाहिरातीत ‘अर्जंट भरती’ असा उल्लेख करून विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दहावी, बारावी उत्तीर्णापासून पदवीधर, आयटीआय व डिप्लोमा धारकांना विविध पदांवर तातडीने नोकरी देण्याचे आमिष दाखविले आहे. चांगला पगार, कोणताही करार नसणे, मुलींना प्रथम प्राधान्य तसेच राहण्याची आणि जेवणाची सुविधा अशा विविध प्रलोभनांचा त्यात उल्लेख आहे. त्यामुळे बेरोजगार युवक-युवतींची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला, पण संबंधिताने कॉल उचलला नाही. त्यामुळे या क्रमांकामागे कोण आहे, जाहिरात कोणी तयार केली, ती सोशल मीडियावर कोणी प्रसारित केली आणि यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे.
















