बीड : प्रतिनिधी
दीर्घ काळानंतर परळीच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली आहे. परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे १५ वर्षांनी एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत दोघांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती होणार आहे. या युतीवर आज दोन्ही नेत्यांकडून अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
परळी नगर परिषदेच्या ३५ जागांपैकी भाजप १२ ते १५ जागांवर, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) २० ते २३ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजप महायुतीला केवळ ५ जागांवर विजय मिळाला होता, तर राष्ट्रवादी आघाडीने तब्बल २८ जागा जिंकून सत्ता हस्तगत केली होती. मात्र यंदा मुंडे बहीण-भावांच्या एकत्रित नेतृत्वामुळे परळीचा राजकीय समीकरणांचा पटच बदलणार असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे आगामी परळी नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

