छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधीनगर भागात राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांनी व दगडाने हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढवत होते. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप करत मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी जुन्या वादातून आणि निवडणुकीतील पराभवाच्या संतापातून बंटी चावरिया यांच्या घराला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.
हा संपूर्ण हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, व्हीडीओमध्ये काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराच्या दिशेने दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून उभ्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
१४ जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे. बंटी चावरिया यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लू चावरिया यांच्यासह एकूण ४ जणांविरोधात दंगल घडवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावणे या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी गांधीनगर परिसरात बंदोबस्त वाढवला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत.

