लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात तिसरी परिवर्तन आघाडी आकाराला येत असून विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती व प्रमुख विरोधक असलेल्या महाविकास आघाडीला आव्हान परिवर्तन आघाडी देणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी लातूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
महाराष्ट्र राज्याला एक चांगला राजकिय पर्याय देण्यासाठी आता तिसरी परिवर्तन आघाडी आकाराला येत असून राज्याला माझ्या व शेतकरी संघटनेचे नेते शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार वामनराव चटप यांच्या पुढाकारातून ही परिवर्तन आघाडी साकारली जात आहे. राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघ ही आघाडी लढवणार असल्याचे ही राजू शेट्टी यांनी सांगत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही जनता कंटाळली आहे. त्यामुळे तिस-या पर्यायाचा विचार केला जात आहे. शंकरअण्णा धोंडगे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्वतंत्र भारत पक्षाचे माजी आमदार वामनराव चटप, धोंडगे यांच्यासोबत माजी आमदार कपिल पाटील व इतरछोट्या मोठ्या पक्ष व संघटना यांनाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांनी परिवर्तन आघाडी सोबत येण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे परिवर्तन आघाडीत स्वागत करून आणखी काही संघटनाही सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे ही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य समितीचे अध्यक्ष माजी आ. शंकरअण्णा धोंडगे महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.