27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeमहाराष्ट्रपरीक्षेला जाताना महिला परीक्षार्थ्यांना मंगळसूत्र, दागिने काढण्याची सक्ती

परीक्षेला जाताना महिला परीक्षार्थ्यांना मंगळसूत्र, दागिने काढण्याची सक्ती

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थ्यांना अत्यंत संतापजनक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना त्यांचे मंगळसूत्र आणि नाकातील दागिने काढण्याची सक्ती करण्यात आली. धातूचे कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई असल्याचे कारण देत प्रशासनाने ही कडक पावले उचलली होती. मात्र, अनेक केंद्रांवर दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने महिलांची मोठी गैरसोय झाली. काही महिलांना आपले दागिने सोबत आलेल्या नातेवाईकांकडे सोपवावे लागले, तर ज्यांच्यासोबत कोणीही नव्हते त्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

कडक तपासणीच्या नावाखाली महिलांच्या भावनांचा विचार न केल्याने प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या सक्तीमुळे परीक्षा केंद्राबाहेर तणावाचे आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे महिला परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या नावाखाली होणारी ही अडवणूक चुकीची असल्याची भावना व्यक्त होत आहे.

राज्यभरात आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटीची परीक्षा आहे. या परीक्षेला जाताना परीक्षार्थींना वेगळीच परीक्षा द्यावी लागली आहे. परीक्षा केंद्रात आत जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून जावे लागले आहे. आज सकाळी ९:३० ते १२ यावेळेत परीक्षा आहे. तत्पूर्वी सकाळी सात वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलचे साहित्य सोबत घेऊन जाऊ नका असे गेटवरच सांगण्यात आले. महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र, कानातले-नाकातले दागिने काढण्याच्या सूचना केल्या त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे मंगळसूत्रासह अंगावरचे सगळे दागिने काढावे लागले. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रात जाताना अडचण झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR