सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर दोन महिन्यांसाठी लावण्यात आलेली बंदी अखेर प्रशासनाने मागे घेतली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यासंदर्भात नवा आदेश काढत कोणत्याही प्रकारची बंदी राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या आधी २० जून ते १९ ऑगस्टपर्यंत साता-यातील पर्यटन स्थळांवर बंदी लावण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु स्थानिक नागरिक व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता प्रशासनाने बंदी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन मात्र कायम ठेवले आहे.
साता-यातील प्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, वजराई धबधबा, कासपुष्प पठार, बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, महाबळेश्वर, पाचगणी, लिंगमळा धबधबा, ओझर्डे, केरळली सांडवली यांसारख्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. सुरक्षेच्या दृष्टीने आणि मुसळधार पावसामुळे होणा-या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे या ठिकाणी बंदी लावण्यात आली होती.
पर्यटकांमध्ये समाधान
प्रशासनाने यापूर्वी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता. परंतु माध्यमांमधून आलेल्या प्रतिक्रिया, लोकप्रतिनिधींचा दबाव आणि स्थानिक नागरिकांचा संताप लक्षात घेता बंदी रद्द करण्यात आली.