22.2 C
Latur
Friday, September 13, 2024
Homeमहाराष्ट्रपवारसाहब तुमसे बैर नहीं, समरजित तुम्हारी खैर नहीं

पवारसाहब तुमसे बैर नहीं, समरजित तुम्हारी खैर नहीं

मुश्रीफांनी फुंकले रणशिंग

कोल्हापूर : प्रतिनिधी
पवारसाहब तुमसे बैर नहीं, समरजित तुम्हारी खैर नहीं, असे म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजित घाटगेंवर हल्लाबोल केला आहे.

तर कागलमधील निवडणूक ही नायक विरुद्ध खलनायक आहे, असे म्हणत त्यांनी घाटगे यांना डिवचले आहे. त्यामुळे आगामी काळात कागल विधानसभेची लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापुरात तळ ठोकून आहेत.
पवारांच्या उपस्थितीत काल (मंगळवार, दि. ३ सप्टेंबर) शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम कागलमधील गैबी चौकात पार पडला.

यावेळी शरद पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शिवाय थेट मुश्रीफांच्या दारात सभा घेत घाटगेंनी ललकारले. त्यामुळे यावर मंत्री मुश्रीफ काय उत्तर देणार याची उत्सुकता अनेकांना होती. अशातच आता मुश्रीफांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय यावेळी त्यांनी समरजित घाटगे यांना थेट आव्हान देखील दिले आहे.

माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवारसाहेब गैबी चौकात आले आहेत. त्यांनी सातत्याने सांगितले आहे की, राजा विरुद्ध प्रजा अशी लढत असते आणि त्यामध्ये प्रजा जिंकत असते. परवा जयंत पाटील आले. त्यांनी सभा घेतली. काल शरद पवारसाहेबांनी सभा घेतली. माझ्यासारख्या अल्पसंख्याक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे हे सगळे का लागले आहेत? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, पत्रकारांनी पवारांचे तुम्हाला आव्हान वाटते का? असा प्रश्न विचारला असता मुश्रीफ म्हणाले, ‘निवडणुकीच्या निकालात कळेल. कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही. पण पवारसाहेब तुमसे बैर नहीं, समरजित तुम्हारी खैर नहीं.. अशा शब्दांत त्यांनी समरजित घाटगे यांना खुले चॅलेंज दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR