28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeलातूरपवार कुटुंबीयांचे माजी आमदार धिरज देशमुख यांच्याकडून सांत्वन

पवार कुटुंबीयांचे माजी आमदार धिरज देशमुख यांच्याकडून सांत्वन

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवाचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी काटेवाडी येथील निवासस्थानी आणि बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाऊन अंत्यदर्शन घेतले. पवार कुटुंबीयांचे तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारा एक मोठा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजितदादा हे महाराष्ट्राचे लाडके नेते होते. घराघरात पोचलेले दादा होते. लोकसेवेसाठी त्यांनी स्वत:चे आयुष्य वाहून घेतले होते. आम्हाला त्यांच्याकडून हा लोकसेवेचा संस्कार शिकता आला.
मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विधिमंडळात आलो, त्यावेळी अजितदादांनी कायम मार्गदर्शन केले. आमदार म्हणून जबाबदारी काय असते, विधिमंडळात प्रश्न कसे मांडावेत अशा विविध विषयांवर नव्याने निवडून आलेल्या युवा आमदारांना ते सल्ला द्यायचे. अशावेळी समोरचा आमदार कोणत्या पक्षाचा आहे, हे ते पहायचे नाहीत. विविध पक्षातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी त्यांचे मैत्रीचे, आपुलकीचे संबंध होते. त्यांचे कार्य, त्यांनी दिलेले योगदान कायम नवी दिशा देणारे आहे.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब, आदरणीय आर. आर. पाटील साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून घडलेले, ग्रामीण महाराष्ट्राने घडवलेले नेतृत्व आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. महाराष्ट्राला विकासाची दिशा दिली.
या नेत्यांनी महाराष्ट्राची  आणखी दीर्घकाळ सेवा केली असती. पण हे नेते आज  आपल्यात राहीले नाहीत. ही कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी आहे, अशा भावना यावेळी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR