शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता, पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वैरण विकास योजनेंतर्गत ज्वारीचे चारा बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे डॉ. दुर्गेश गोल्हेर यांनी केले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत राबविण्यात येणा-या या योजनेसाठी १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्जासाठीची लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्रासाठी चार हजार रुपयांपर्यंत, तर नोंदणीकृत शेतकरी समूहाला पाच हेक्टर क्षेत्रासाठी २० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. वैयक्तिक लाभार्थ्यांकडे स्वत:ची जमीन, सिंचन सुविधा आणि किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक आहे. अर्जासोबत सातबारा उतारा, पशुधनाचा पुरावा व आवश्यक कागदपत्रे जोडावीत. पशुपालकांनी हिरव्या चा-याचे उत्पादन घेऊन भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी चारा साठवणूक किंवा सायलेज पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन पशुसंवंर्धन विभागाने केले आहे.
















