लातूर : प्रतिनिधी
इयत्ता ११ वी ची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शुन्य प्रवेश प्रक्रीये नंतर पहिल्या प्रवेश फेरी बुधवार दि. ३ जून रोजी पार पडली. या पहिल्या प्रवेश फेरीत ९ हजार ७१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर दुसरी प्रवेश फेरीसाठी शनिवार दि. ६ जून पासून विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करता येणार आहे.
शेक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लातूर जिल्हयात राबविली जात आहे. दि. ८ मे रोजी इयत्ता १० वी चा निकाल जाहिर झाल्यानंतर दि. ११ मे पासून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग-१ आणि भाग-२ भरुन इयत्ता ११ वी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्याची सुविधा https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करुन दिले होते. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरुन नोंदणी केलेली होती. शुन्य प्रवेश प्रक्रीये (इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटा) नंतर पहिली प्रवेश प्रक्रीया ३ जून रोजी पार पडली. या पहिल्या प्रवेश फेरीत ९ हजार ७१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
विज्ञान शाखेत सर्वाधिक प्रवेश https://mahafyjcadmissions.in
लातूर जिल्हयात इयत्ता ११ वी ची शुन्य प्रवेश प्रकीया पार पडल्या नंतर प्रवेशाची पहिली फेरी पार पडली. यात विज्ञान शाखेसाठी ५ हजार ५९२ सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. तर कला शाखेसाठी २ हजार ५६४ प्रवेश झाले आहेत. वाणिज्य शाखेसाठी १ हजार ७१ प्रवेश झाले आहेत. तसेच इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोटयातून ४८६ प्रवेश झाले आहेत.
शिक्षण विभागात सावळागोंधळ
लातूर जिल्हयातून इयत्ता ११ वी प्रवेशासाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली या संदर्भाने माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाला विचारली असता ते हातबल होऊन लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे बोट दाखवतात. सदर विभागाकडून माहिती मिळाली तर सांगता येईल. प्रवेश प्रक्रीयेच्या संदर्भाने आमच्या विभागाकडे लॉगीन व पासवर्डही नाही. त्यामुळे लातूर जिल्हयातील प्रवेश प्रक्रीये विषयी माहिती देण्याविषयी आडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची यंत्रणा ढेपाळली
लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालया मार्फत लातूर, धाशिव व नांदेड जिल्हयातील शिक्षण विभागाचा कारभार चालतो. या कार्यालयाकडे इयत्ता ११ वी ची सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रीयेची माहिती (लॉगीन व पासवर्ड) पाहण्याचा अधिकार आहे. या विभागाकडूनच अद्यावत माहिती इतर जिल्हयांना वेळेत दिली जात नाही. त्यामुळे त्या-त्या जिल्हयाचा शिक्षण विभाग हातबल होत आहे. विशेष म्हणजे लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडूनही प्रवेश प्रक्रीयेची माहिती वेळेत दिली जात नाही. सर्व विभाग प्रमुख संपर्क साधला तरी कोणताही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संदर्भातल्या तक्रारीचा वेळेत निपटारा कसा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर कार्यालयाची यंत्रणा कुचकामी झाल्याची चर्चा होत आहे.
















