बंगळूरु : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभर नाचक्की झालेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह सर्व मुद्यांवर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारतासोबत चर्चा करण्यासाठी मनधरणी केली आहे. भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत पाकिस्तानचे नऊ हवाई तळ आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ नेस्तनाबूत करण्यात आले होते.
यानंतर पाकिस्तानने भारतासोबतच्या वाटाघाटी थांबविल्या. त्यानंतर भारताने पाकवर वॉटर स्ट्राईक करत सिंधू पाणी वाटप करारास स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी भारतासमोर बिनशर्त चर्चेची तयारी दर्शविली आहे. पाकिस्तानी माध्यमांसोबत संवाद साधताना नरमाईची भूमिका घेत ते म्हणाले की, इस्लामाबाद काश्मीरसह सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे.
इशाक दार यांनी याआधीही जुलै महिन्यात चर्चेसाठी भारताकडे पाठपुरावा सुरू केला होता. तथापि, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देशांकडून दहशतवादास खतपणी घालण्याचे काम सुरू असल्याने पाकसोबत चर्चा करण्यामध्ये स्वारस्य नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सीमेपलीकडील दहशतवाद थांबल्याशिवाय पाकसोबत चर्चा करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

