23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeक्रीडापाकला लोळवत ‘ई’शानदार विजय

पाकला लोळवत ‘ई’शानदार विजय

महाशिवरात्र आणि भारत- पाकिस्तान सामना असताना १ मार्च २०२३ रोजी किंग्स मिड दर्बन येथे भारताने पाकिस्तानला हरवले होते. त्याचीच पुनरावृत्ती रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने केली आणि संपूर्ण भारतभर महाशिवरात्री दिवशी पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. या सामन्यात फक्त ईशानच्या फलंदाजीमुळे भारताला विजय मिळवता आला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी हाराकिरी केली म्हणा किंवा नांगी टाकली असेच म्हणावे लागेल आणि टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत विजयाचा ८-१ स्कोअर केला.

गोलंदाजी करताना एक क्षण थांबून चेंडू टाकणा-या उस्मान तारीकची सूर्या आणि ईशानने भंबेरी उडवली आणि फलंदाजीमध्ये बदल करत त्याला चार षटकात २४ धावा द्यायला भाग पाडले. खरे तर नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तान कर्णधाराने फलंदाजी घ्यावयाची गरज होती पण त्यांनी भारताला पाचारण केले. कारण सायंकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती आणि दुस-यांदा डाव खेळताना षटके कमी झाली तर धावांचा पाठलाग करणा-याला सरासरी रनरेट वाढत जातो. कर्णधार सलमान आगाने प्रथम गोलंदाजी करण्याची चाल रचली त्यांनी सात गोलंदाजांना वापरले. हाणामारीच्या शेवटच्या षटकात शाहीन आफ्रीदीला गोलंदाजी का दिली हे पण अनाकलनीय भारताकडून खेळणा-या डावखु-या फलंदाजांनी फलंदाज पाकिस्तानी फिरकी समोर १७५ धावांचा डोंगर उभा केला. अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या हाणामारीच्या प्रयत्नात लवकर परतले पण त्यामुळे काही फरक पडला नाही.

एकंदरीत भारतीय संघ फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्रक्षणात पाकपेक्षा वरचढ ठरला. ईशान किशनने २७ चेंडूत अर्धशतक तर ४० चेंडू ७७ धावा फटकावल्या. १२० चेंडूत विजयासाठी १७६ धावा काढण्याचे आव्हान पाकला पेललेच नाही. पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे तीन फलंदाज तंबूत परतले आणि भारतीय संघाचा विजय निश्चित होणार याची चुणूक लागली. भारत वि पाकिस्तान सामन्याची धार बोथट झाल्या प्रेमदासा मैदानावर बघायला मिळाली. भारतीय संघाने कष्टाने उभारलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी फलंदाजीची दाणादाण उडाली. संथ खेळपट्टीवर ईशान किशनच्या खेळीचे मोल पाकिस्तानची फलंदाजी चालू झाल्यावर जास्त उमगले. कारण तो एकटाच गोलंदाजांना पुरून उरला. मोठ्या विजयासह भारताने सुपर ८ फेरीत दिमाखात प्रवेश केला यष्टीरक्षणातही ईशान किशनने बाजी मारली चपळाईने एक स्टंप आऊट पण केला.

वरूणला गोलंदाजी न देता इतरांना देऊन सूर्याने विजय का लांबवला? रिंकूने दोन झेल टिपले तर तिलकने स्वत:च्या गोलंदाजीवरील एक व सीमारेषेवर एक असे दोन झेल सोडले. या सामन्यातही कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकी वेळी व विजय मिळाल्यानंतरही पाक कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही. तर नाणेफेकीसाठी नेहमी येणारे रवी शास्त्री ही आले नाहीत आणि त्यांनी तटस्थ निवेदिकाला नाणेफेकीसाठी पाठवले. आपण सारे भारताच्या विजयाने आनंदित आहोत. पण पूर्वी असायची तशी चुरशीची मॅच बघण्याचा आनंद मिळाला नाही.हे ही तितकेच खरं! असो शेवट गोड तर सर्वच गोड!
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR