अबुधाबी : पाकिस्तानने मंगळवारी कसाबसा श्रीलंकेवर विजय साकारला आणि आपले आशिया कप स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले. दुसरीकडे श्रीलंकेचा हा दुसरा पराभव ठरला. यापूर्वी त्यांना बांगलादेशने पराभूत केले होते तर या सामन्यात त्यांना पाकिस्तानने पराभूत केले. त्यामुळे आशिया कपमधील श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तानने श्रीलंकेला १३३ धावांत रोखले आणि हे आव्हान पाच विकेट्स राखत पूर्ण केले.
पाकिस्तानपुढे विजयासाठी १३४ धावांचे मोठे लक्ष्य नव्हते. पण त्यांच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. शाहिबझादा फरहान आणि फखर झमान या दोघांनी संघाला ५ षटकांत ४५ धावा करून दिल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सहजपणे हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण त्यानंतर पाकिस्तानला धक्के बसत गेले. पहिला धक्का बसला. फरहान २४ धावांवर बाद झाला, त्यानंतर एका चेंडूनंतर झमानही १७ धावांवर बाद झाला. पाकिस्तानला तीन चेंडूंत दोन धक्के बसेल होते. त्यामुळे त्यांची बिन बाद ४५ वरून २ बाद ४६ अशी अवस्था झाली होती. या दोन्ही विकेट्स महिक्षा तिक्षणाने काढल्या होत्या. त्यानंतरही घसरगुंडी सुरू राहिली. त्यामुळे एकवेळ पाकिस्तानला पुन्हा पराभव पत्करावा लागणार की काय, अशी स्थिती होती. परंतु हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
















