इस्लामाबाद : वृत्तसंस्था
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये जवळीक वाढल्याचे दिसत आहे. असीम मुनीर यांनी सहा महिन्यात दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दरम्यान, आता पाकिस्तानने प्रस्तावित असलेले ‘पासनी बंदर’ अमेरिकेला ऑफर केले आहे. हे पाकिस्तानच्या किनारी शहरात पासनी येथे आहे. हे शहर ग्वादर बंदराच्या अगदी जवळ आहे आणि इराणच्या अगदी जवळ आहे.
अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये पासनी बंदराबाबत वाटाघाटी सुरू आहेत. फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे काही खास सल्लागार बंदर कराराबद्दलचा संदेश घेऊन अमेरिकेला गेले होते. माहितीनुसार, हे बंदर एका रेल्वे लाईनशी जोडले जाणार आहे. हे पाकिस्तानमधून तांबे आणि अँटीमोनी सारख्या खनिजांची वाहतूक करणार आहे. या खनिजांचा वापर बॅटरी, अग्निशामक यंत्रे आणि क्षेपणास्त्रांमध्ये केला जातो.
दरम्यान, या बंदरामुळे भारताच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण हे बंदर इराणच्या चाबहार बंदरापासून जवळ आहे. अमेरिकेचा पाठिंबा असल्यामुळे पाकिस्तानला नेहमी भारतावर लक्ष ठेवता येणार आहे.
















