जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यात यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा परिणाम आता ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर होऊ लागला असून, तालुक्यातील ४४ हातपंप आणि २२ विद्युत पंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. याशिवाय विविध कारणांमुळे १५ पाणीपुरवठा योजनाही बंद असल्याने संबंधित गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जळकोट तालुक्यात एकूण १३३ हातपंप आहेत. त्यापैकी ८९ हातपंप सुरू असून, ४४ हातपंप पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे या हातपंपांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील १२५ विद्युत पंपांपैकी १०३ पंप सध्या सुरू आहेत, तर २२ विद्युत पंप पाण्याअभावी बंद आहेत. जळकोट तालुक्यातील १५ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने पाणीटंचाईच्या समस्येत भर पडली आहे. मंगरूळ येथे पाणीपुरवठा करणा-या विहिरीत गाळ साचल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद आहे. फकुरू तांडा आणि पोमातांडा येथे विहिरीला पाणी नसल्याने पाणीपुरवठा करता येत नाही. जगळपूर बुद्रुक येथे तलावाजवळ पाइपलाइन नसल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद आहे, तर कोळनूर येथे तलावातील पाइपलाइन नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
डोंगर कोनाळी येथे विहिरीत गाळ साचल्यामुळे, तर सोनवळा येथे मोटार नादुरुस्त असल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद आहे. बोरगाव खुर्द येथेही पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना बंद असल्याची माहिती आहे. करंजी येथे पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत जोडणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे कोणत्याही विभागाने दुर्लक्ष करू नये, तसेच नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेळेत करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
















