लातूर : एजाज शेख
यंदाचा पावसाळा जवळपास संपत आला आहे. मात्र लातूर जिल्ह्यात अद्यापही वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात तब्बल ३१ टक्के पावसाची तुट आहे. परिणामी लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणात नव्याने पाण्याचा संचय झाला नाही. त्यामुळे आजघडीला मांजरा धरणात केवळ १२.९६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकीकडे धरणात मुबलक पाणी नाही आणि दुसरीकडे लातूर शहरात पाण्याची उधळपट्टी सुरु आहे. दुष्काळाचे घोंगावणारे संकट लक्षात घेता पाण्याची नासाडी परवडणारी नाही.
त्यामुळे पाण्याचा थेंबन्थेंब वाचवणे गरजेचे आहे.
जून ते ऑगस्ट या मान्सून हंगामात लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत पाऊस खुप कमी झाला आहे. पावसाने दडी मारल्याने लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणात अत्यल्प उपयुक्त पाणीसाठा आजघडीला आहे. पाणी टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे असताना लातूर शहरात मात्र, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला गांभीर्य आहे की नाही, अशी शंका येण्याईपत दुर्लक्ष होत आहे. आजही शकरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
गंजगोलाईत पुर्णत: सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. या परिसरात ज्या-ज्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्या-त्या दिवशी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याखालून फुटलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जाते. गंजगोलाईतील जय जगदंबा देवी मंदीरच्या पश्चिम महाद्वारसमोरील सिमेंट काँक्रीटच्या रोडच्या खाली गेल्या अनेक वर्षांपासून जलवाहिनी फुटलेली आहे. पाणी पुरवठा होताच या गळक्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी रस्त्याने वाहते. या शिवाय मध्यमवर्ती बसस्थानकासमोरही सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या खाली जलवाहिनी फुटलेली आहे. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिण्यांना गळती आहे. पावसाअभावी निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याची नासाडी परवडणारी नाही.
















