लातूर : प्रतिनिधी
शहरातील बोधेनगर परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, खेळत असताना पाण्याच्या डबक्यात पडून २ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १७ मे रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोधेनगर येथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागील भागात टँकरसाठी पाणी साठविण्यात येणा-या डबक्यात खेळता खेळता दोन चिमुकले पडले. यात दिव्या नवनाथ उबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे (७) यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे बोधेनगर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशा धोकादायक पाणीसाठ्याभोवती सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
















