-६ लाख २२ हजार २०७ शेतक-यांना दिलासा : मुख्यमंत्री
सर्व शेतक-यांचे पैसे
महिन्यात जमा होतील
मुंबई : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतक-यांना ५ हजार २९ कोटींचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. जसजशी खाती प्रमाणित होतील तसतशी रक्कम संबंधित शेतक-यांच्या खात्यात जमा होईल व खाते नील होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साधारणपणे महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्ती योजनेचा आढावा सह्याद्री अतिथीगृह येथे घेतला, त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. आषाढीला आपण पहिली यादी घोषित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपण ती सर्व ग्रामपंचायतींना पाठवली. तिथे यादी वाचन झाले. त्यानंतर शेतक-यांनी केवळ आधार प्रमाणीकरण करून, अॅग्रीस्टॅक क्रमांक देण्याची आवश्यकता होती. इतर कोणतीही कागदपत्रे न मागता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अद्यापही १८ ते १९ लाख खात्यांची प्रक्रिया सुरू आहे. १२ लाख खाती आपण बँकांना परत पाठवली. कारण त्यात बँकांकडून चुका झालेल्या होत्या. आठवडाभरात ही खातीदेखील दुरूस्त होणार आहेत. सर्वसाधारणपणे ८० टक्के प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होते. २० टक्क्यांमध्ये काही तांत्रिक अडचणी असतात, म्हणून वेळ लागतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शेतक-यांना सिबिलची अट लागणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तातडीने कर्ज उपलब्ध
करून देण्याचे निर्देश
राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतक-यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून शेतक-यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळणार आहे. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
















