अन्वर शेख
पाथरी : पाथरी नगर परिषदेवर अंतिम निकाल जाहीर होताच नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आसेफ खान निवडून आले असून काँग्रेसला २३ नगरसेवकापैकी १२ नगरसेवकासह बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पाथरी नगरपालिकेत कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे शिवसेनेचे ९ तर राष्ट्रवादीचे २ नगरसेवक जिंकले आहेत.
पाथरी येथील निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अतिशय अटीतटीच्या व विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जुनैद दुर्रानीसह यांच्यासह माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांना सोडून शिवसेनेत जाणारे अनेक दिग्गज नगरसेवकांचाही पराभव झाला.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आ. राजेश विटेकर यांच्या पॅनलला अवघ्या २ नगरसेवकावर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असेफ खान यांना १० हजार ६२६ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार जुनैद दुर्राणी यांना १० हजार १९० मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार मोईज अन्सारी यांना ५ हजार ३७२ एवढी मते मिळाली. नगराध्यक्ष शिवसेनेचा असून बहुमत काँग्रेसकडे असले तरी राजेश विटेकर वर्तमान आमदार असल्याने पाथरीत पुढील काळात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळु शकतो.

