निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील पानचिंचोली येथील अतुल भरत दिवे वय २८ वर्षे हा पानचिंचोली येथून निटूरकडे जात असताना मंगळवारी दि ४ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान कवठापाटी च्या पुढे निटूरहून लातूरकडे जाणा-या भरधाव आयशर टेम्पोने रॉंग साईड येऊन त्याच्या दुचाकीस जोरदार टक्कर दिली. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. कांहीं आठवड्या पूर्वीच त्याच्या मोठ्या भावाचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. लागोपाट दोन तरुण मुले गेल्यामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या बद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील युवक अतुल भरत दिवे हा तरुण पानचिंचोली येथून थेरगावला दुचाकी क्रमांक एम एच २४ एस ६३७० या पॅशन प्रो गाडीवरून थेरगावला जात असताना कवठा पाठी गौर शिवारात निटूरकडून लातूरकडे येणा-या एम एच २४ ए यू ३१९८ या आयशर टेम्पोने भरधाव वेगात रॉंग साईड येऊन त्याला जोराची धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले.
त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. सदरील लातूर-जहीराबाद रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने अपघाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. भरधाव गाड्या चालविणा-यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

