लातूर : प्रतिनिधी
१२ दिवसांच्या गणेशोत्सवाने लातूर शहराला भक्ती, उत्साह आणि सामाजिक सलोख्याच्या रंगात रंगवल्यानंतर दि. २५ सप्टेंबर रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढो-ताशांचा निनाद, ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष आणि डोळ्यात दाटलेला भाव , अशा भक्तिमय वातावरणात सकाळी ११.३० वाजल्यापासून मानाच्या आजोबा गणपतीसह विविध गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या. भक्तांच्या श्रद्धेला प्रशासनाच्या नियोजनाची आणि गणेश मंडळांच्या सहकार्याची साथ लाभल्याने गणेशोत्सवाची सांगता सुमारे २० तासानंतर शांततेत झाली.
विसर्जनाचा पहिला मान असलेल्या शहराच्या भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाच्या ‘श्री’ची आरती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर ११.३० वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. मानाच्या आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरु होताच शहरातील विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. डॉल्बी, डीजेमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले होते. या आवाहनास शहरातील सर्वच गणेश मंडळांनी प्रतिसाद देत विसर्जन मिरवणुका डॉल्बी व डीजेमुक्त काढण्यात आल्या. ढोल, ताशे, हलगी, तुतारी, ब्रास बँण्ड, लेझीमपथक, झांजपथक, टिप-या आदी पारंपारीक वाद्यांसह निघालेल्या विसर्जन मिरवणुकांत जोष भरला होता.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील महात्मा गांधी चौकपासून ते गरुड चौक, मंठाळेनगर ते गावभाग या परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुका मेन रोड मार्गे गंजगोलाई, भूसार लाईन, सूभाष चौक, दयाराम रोड, खडक हनुमान, तेलगल्ली, पटेल चौक मार्गे ग्रामदैवती श्री सिद्धेश्वर मंदीर परिसरात जाऊन तेथे ‘श्रीं’ विसर्जन करण्यात आले. तर महात्मा गांधी चौकापासून पुढे शहराच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागांतील श्री गणेशमुर्ती संकलन केंद्रांवर जाऊन ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. शहरातील विसर्जनानाचा शेवटचा मान असलेले श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाच्या ‘श्रीं’चे आगमन रात्री १२ वाजता सुभाष चौकात झाले. त्यानंतर विसर्जन मिरवणुक सुभाष चौकातून पुढे जाऊन सकाळी ६.३० वाजता ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले.
















