27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeमहाराष्ट्रपार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या ,जमीन व्यवहाराची होणार चौकशी

पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या ,जमीन व्यवहाराची होणार चौकशी

मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

नागपूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पार्थ पवारांशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणातील मुद्दे अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि भूमी अभिलेख विभाग (लँड रेकॉर्डस्) यांच्याकडून सर्व माहिती मागवली असून, योग्य चौकशीचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना देण्यात आली. त्यातही या खरेदी व्यवहारातील स्टँप ड्युटी माफ करून फक्त ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर हा व्यवहार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यासंबंधी अद्याप माझ्याकडे माहिती नाही. मात्र अशी अनियमितता झाली असेल तर कारवाई झाली पाहिजे या मताचे आमचे सरकार असल्याचे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौ-यावर आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील जमीन व्यवहारावरून विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या जमीन व्यवहार प्रकरणी माझ्याकडे अद्याप पूर्ण माहिती आलेली नाही. अजित पवारांच्या मुलावर जे आरोप होत आहेत, ते गंभीर आहेत. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती घेऊनच बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील अशा घटनेला पाठीशी घालतील असे वाटत नाही, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुठेही अनियमितता झाली असेल तर तिथे कारवाई झाली पाहिजे या मताचे आमचे सरकार आहे. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही या प्रकरणाबद्दल माहिती नसल्याचे म्हटले आहे. यामध्ये कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई होईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR