पुणे : प्रतिनिधी
नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून काही मान्यवर आमचे इतके आमदार आहेत, असा दावा करतात. मात्र, कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. पालकमंत्री नसतानाही या जिल्ह्याची कामे सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे यापुढे पत्रकारांनी हा प्रश्न विचारू नये, असे सांगत स्वपक्षीय मंत्री छगन भुजबळ यांनाही अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. विधान भवनात झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
नाशिक व रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना व राष्ट्रवादीत वाद उफाळला आहे. गोगावले यांनी या पालकमंत्रिपदावर शिंदेंचा दावा असल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिल्यानंतर आता त्यांनीही नाशिकच्या पालकमंत्रिपदावर अप्रत्यक्षपणे दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
रायगडमध्ये केवळ एक आमदार असताना राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद मिळाले होते. नाशिकला राष्ट्रवादीचे ७ आमदार असल्याने पालकमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळावे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले होते. याबाबत अजित पवार यांना विचारले असता पालकमंत्री नेमण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. या दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नसतानाही तेथे कोणतीही अडचण आलेली नाही. तेथील कामे सुरळीत सुरू आहेत, असे पवार म्हणाले.

