लातूर : प्रतिनिधी
जगात सर्वात मोठा प्रेरणेचा स्त्रोत आपले मायबाप आहेत. यापेक्षा दुसरा कुठलाच स्त्रोत मोठा होऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचे आणि उर्जेचे स्त्रोत बनावे, असे प्रतिपादन कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, नेटीझन्स फाऊंडेशन व संतवाणी परिवार, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दयायंद सभागृहात आयोजित संस्काररत्न दिलीप शेटे स्मृती सन्मित्र पुरस्कार, व्याख्यानमाला व काव्य मैफिलीमध्ये ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष देविदास बस्वदे, नेटीझन्स फाऊंडेशनचे संचालक प्रा. सुधाकर तोडकर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुनील हाके, राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बालकुंदे, जिल्हा सरचिटणीस सुनील बिराजदार, कचरू शेटे, सविता शेटे उपस्थित होते.
भविष्याचा वेध घेऊन पालकांनी आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवणे अपेक्षित असल्याचे सांगून कवी राऊत म्हणाले की, पुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणिव-नेणिवा रूजवणे काळाची गरज आहे. यावेळी कवी अनंत राऊत यांचा ‘सन्मित्र पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार केवळ एक सन्मान नाही, तर ‘मैत्री’ या नात्याचा गौरव आहे. मित्राच्या मैत्रीची जाणीव ठेवून मित्रांनी मित्रासाठी आयोजित केलेला हा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, यामुळे समाजातील सकारात्मक नातेसंबंधांचे मूल्य पुन्हा एकदा पुढे आले आहे, असे कवी राऊत म्हणाले. अध्यक्षीय समारोप देविदास बस्वदे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुधाकर तोडकर यांनी केले. आभार प्रा. पठाण यांनी मानरले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांबरोबरच, तरूणवर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.

