21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeअंतरराष्ट्रीयपालक-पनीरचा तडका उडाला; कोलोरॅडो विद्यापीठाला महाग पडला!

पालक-पनीरचा तडका उडाला; कोलोरॅडो विद्यापीठाला महाग पडला!

वर्णभेद । भाजी गरम करण्याच्या वादातून खटला; भारतीय विद्यार्थ्यांना मिळाली १.८ कोटीची भरपाई

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
जेवणात आणलेल्या ‘पालक पनीर’चा वास येतो, या कारणावरून झालेल्या भेदभावाविरुद्ध कायदेशीर लढाई लढणा-या दोन भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत विजय मिळवला आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर’ या विद्यापीठातील भारतीय पीएचडी विद्यार्थी आदित्य प्रकाश आणि उर्मी भट्टाचार्य यांनी पालक पनीरशी संबंधित भेदभावाच्या घटनेवरून नागरी हक्कांच्या खटल्यात १.८ कोटी रुपये (२००,००० डॉलर्स) नुकसान भरपाई मिळवली आहे.

‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर’ या विद्यापीठात आदित्­य प्रकाश आणि त्­यांच्­या पत्­नी उर्मी पीएचडी करत होते. सप्टेंबर २०२३ मध्ये विभागातील मायक्रोवेव्हमध्ये आपले जेवण ते गरम करत होते. एका कर्मचा-याने जेवणाच्या ‘वासाचे’ कारण देत त्यांना तिथे जेवण गरम करण्यास मज्जाव केला. हा फक्त अन्नाचा वास आहे, मी जेवण गरम करून लगेच जात आहे, असे आदित्य यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या साध्या संवादाचे रूपांतर मोठ्या वादात झाले.

३५ वर्षीय उर्मी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या ‘टीचिंग असिस्टंट’ पदावरून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे तर, पालक पनीरच्या घटनेनंतर दोन दिवस मुद्दाम भारतीय जेवण जेवल्यामुळे त्यांच्यावर दंगल भडकवल्याचा धक्­कादायक आरोपही ठेवण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणावरून कायदेशीर लढाई लढण्­याचा निर्धार आदित्य आणि उर्मी यांनी केला. कोलोरॅडो येथील युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टात विद्यापीठाविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला. त्यांनी आरोप केला की, आदित्य प्रकाश यांनी ‘भेदभावपूर्ण वागणुकीबद्दल’ चिंता व्यक्त केल्यानंतर, विद्यापीठाने सूडबुद्धीने कारवाई केली. अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये विद्यापीठाने या दोघांना १.८ कोटी रुपये देण्याचे आणि त्यांची ‘मास्टर्स’ पदवी प्रदान करण्याचे मान्य केले. मात्र, या तडजोडीनुसार त्यांना भविष्यात या विद्यापीठात शिक्षण घेण्यास किंवा नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आता हे दाम्पत्य नुकतेच भारतात परतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR