रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप पिकांपाठोपाठ आता ऊस उत्पादक शेतकरीही संकटात सापडले आहेत. जून महिन्यापासून अत्यल्प पाऊस झाल्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून, भूजलपातळी खालावल्याने ऊस जगविण्याचे मोठे आव्हान शेतक-यांसमोर उभे राहिले आहे. कारखान्याला ऊस जाईपर्यंत पिकाला पुरेसे पाणी उपलब्ध होईल की नाही, याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करत उसाचे पीक वाचविण्यासाठी शेतक-यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून, पाण्याची पातळीही खालावली आहे. परिणामी उसाच्या अपेक्षित वाढीला फटका बसत आहे. ऊस हे दीर्घकालीन पीक असल्याने कारखान्याला ऊस गाळपासाठी जाईपर्यंत त्याला नियमित पाणी देणे आवश्यक असते. परंतु, सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत उसाला पाणी देणेही जिकिरीचे झाले आहे. पाणीटंचाई कायम राहिल्यास उसाच्या उत्पादनावर आणि वजनावर परिणाम होण्याची भीती आहे.
















