विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी
पुणे : प्रतिनिधी
राज्यात मान्सूनचे अखेर आगमन झाले आहे. मात्र आगमनानंतरही काही भागात पावसाने दडी मारली, तर कुठे कहर केल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाठ फिरवलेल्या मान्सूनची बळीराजाला अजूनही प्रतीक्षा आहे. लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव जिल्ह्यांतील काही भागांत पावसाने हजेरी लावली. तसेच विदर्भात अकोला, वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील २७ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला.
मराठवाड्यात लातूर शहर परिसरास रेणापूर, चाकूर, अहमदपूर, जळकोट भागात चांगला पाऊस झाला. परंतु अद्यापही पेरणीयोग्य स्थिती नाही. त्यातच लातूर तालुक्यासह औसा, निलंगा, देवणी, शिरुर अनंतपाळ तालुक्यात पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. लातूरशिवाय, परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव जिल्ह्यातील काही भागांत हलका ते साधारण पाऊस झाला. त्यामुळे मराठवाड्याच्या अनेक भागांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दुसरीकडे विदर्भातही काही भागांत मुसळधार पाऊस कोसळला असून, अकोल्याच्या पातूरमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी सखल भागात घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. यासोबतच तालुक्यातील सुवर्णा नदीसह इतर नद्या आणि नाल्यांना पूर आला. पातुर शहरातील मुजावरपु-यात पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यातही मानोरा, रिसोड आणि वाशिम तालुक्यात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बरसला.
मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडणार
मराठवाड्यात परभणी, बीड, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, हिंगोलीत ८ जुलैपर्यंत वेगवेगळ््या भागांत पाऊस पडणार आहे. विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये यादरम्यान पाऊस पडेल.
















