पुढील ५ दिवसही शक्यता नाही, कोवळी पिके संकटात
पुणे : प्रतिनिधी
राज्यात जवळपास ८ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. मराठवाड्यात तर बिकट स्थिती आहे. कारण पावसाअभावी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने वातावरणात उकाडाही वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील बहुसंख्य भागात अजूनही मोठा पाऊस नाही. त्यामुळे पिकांसोबत पिण्याच्या पाण्याचीही चिंता वाढली आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी पुढील ५ दिवस पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर आणि विविध भागांमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. येणा-या काही दिवसांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, बहुतांश भागात उघडीप राहणार आहे, असे एस. डी. सानप म्हणाले. मराठवाडा, विदर्भात तर बिकट स्थिती आहे. या भागांतून ढगही गायब झाले असून, उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कोवळी पिके संकटात सापडली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट होऊ लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
पाच दिवसांत
शक्यता कमीच
पुढच्या पाच दिवसांमध्ये सर्वदूर पावसाची शक्यता नाही. पावसाचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे असेल किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्यामुळे तूट भरुन निघण्याची शक्यता कमी आहे. आता कोणतीही सिस्टीम म्हणजेच कमी दाबाचे क्षेत्र किंवा मान्सूनचे वारे सक्रीय आहेत, अशी परिस्थिती नाही, असे हवामान तज्ज्ञ सानप म्हणाले.
बंगालच्या उपसागरात
कमी दाबाचे क्षेत्र
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम हा उडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड या भागांमध्ये होत आहे. आपल्याकडे पुढच्या चार ते पाच दिवसांत तरी त्याचा परिणाम होणार नाही. अजून काही हवामान बदल झाले तर पुढील काळात सांगण्यात येईल, असे सानप म्हणाले.
















